नवी दिल्ली – राष्ट्रकुल स्पर्धेसाठी दिल्लीला जाताना आशीर्वाद घेण्यास आलेल्या मनोजला मी सांगितलं होतं, “बेटे, अपने देशका नाम रोशन करना। सोनाही लेके घरको लौटके आना।” आणि काय सांगू, त्यानंही सुवर्णपदक मिळवून माझा आशीर्वाद खरा ठरविला…” ६४ किलो वजनी गटात मुष्टियुद्धात लखलखीत कामगिरी करणाऱ्या भारतीय संघातील मनोजकुमारचे वडील शेरसिंह कुलगडिया आज सकाळ न्यूज नेटवर्कला सांगत होते. मनोजकुमार हा पानिपत भागातील अस्सल मराठा गडी आहे, हे फार कमी जणांना माहिती असेल.
हरियानातील कर्नाल जिल्ह्यातील जौंद हे त्याचे मूळ गाव. त्याचे वडील शेरसिंह सैन्यात होते. सैन्यातून निवृत्ती घेतल्यावर ते जौंदमध्ये शेतीवाडी करू लागले. त्यांना राजेश, मनोज व मुकेश ही तीन मुले. तिघांनाही खेळाची आवड. कालांतराने राजेश हरियाना ज्युनिअर बॉक्सिंग संघाचा कोच झाला. त्याने मुकेशमधील गुणवत्ता ओळखून त्याला आपल्याकडे नेले. त्याच्यातील गुणवत्तेला गेल्या बुधवारी तालकटोरा स्टेडियममध्ये पुन्हा “सुवर्णझळाळी’ लाभली. सोनिपत येथे रेल्वेत नोकरीला असलेला मनोज राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी आवर्जून गावी गेला होता. मनोजचं कौतुक करण्यासाठी आपल्याजवळ शब्द नाहीत. त्याने असेच नाव कमवावे एवढेच वाटते, असेही त्यांनी सांगितले. मनोजचे यश हे मराठी मातीचेही यश आहे, असे सांगताच क्षणाचाही विलंब न लावता शेरसिंग उद्गारले, “हम लोग तो मराठाही है साब..!”
हे मराठी कसे?
सन १७६१ च्या पानिपत युद्धाच्या वेळी श्रीमंत भाऊसाहेब पेशव्यांबरोबर येथे आलेली आणि नंतर येथील समाजात विरघळून गेलेली अनेक मूळची मराठी कुटुंबे या भागात आजही आहेत. पानिपत, कुरुक्षेत्र, कर्नाल, जिंद या निवडक जिल्ह्यांत ती राहतात. अनेक पिढ्या उलटल्या तरी आपण मूळचे मराठी आहोत, याचे त्यांना कधीही विस्मरण झाले नाही. त्यांची आडनावेही भोसले, चोपडे, झाकले, चौधरी, राणे, इंगोले अशी आहेत. कोल्हापूरचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. वसंतराव मोरे यांच्या निरीक्षणानुसार, त्यांची संख्या तब्बल सात लाख आहे. अलीकडे त्यांनी आपल्या नावाआधी “मराठा’ असे विशेषण लावणेही सुरू केले आहे. पानिपतनंतर जीव वाचविण्यासाठी आणि कालौघात या लोकांची भाषाही हिंदीच झाली असली, तरी “राम राम’सारखे अनेक मराठी शब्द त्यांनी वापरात कायम ठेवले आहेत.
हरियानातील रोड मराठा समाज
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात वाचलेल्या मराठा योद्ध्यांची पिढी हरियानात रोड मराठा नावाने ओळखली जाते. डॉ. मोरे यांच्या नेतृत्वातील संशोधकांच्या चमूने सहा वर्षांपूर्वी यासंदर्भात बऱ्याच नव्या बाबी समोर आणल्या होत्या. मनोजकुमार हा रोड मराठा कुटुंबातील आहे. शेरसिंह मराठा असे त्यांचे नाव लावतात. मनोजकुमारच्या सुवर्णपदकाने समाजात आनंदाचे वातावरण आहे. रोड मराठा समन्वय समितीचे प्रमुख डॉ. मांगेरामजी चोपडे यांनी “सकाळ’शी बोलताना सांगितले, की शेती व्यवसायात भवितव्य शोधणाऱ्या रोड मराठा समाजातील तरुणांसाठी मनोजकुमार रोल मॉडेल बनला आहे. गेली अडीचशे वर्षे संघर्षरत राहिलेल्या या लढवय्या समाजाच्या नव्या पिढीला क्रीडा क्षेत्रातही भवितव्य असल्याचे मनोजकुमारने दाखवून दिले आहे. मनोजकुमारचा मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आणि हरियानातील रोड मराठा संघटनेचे नेते वीरेंद्र वर्मा यांच्या मदतीने दिल्लीत जंगी सत्कार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
No comments:
Post a Comment