maratha seva sangh, sambhaji brigade, jijau brigade, shivdharma
Sunday, November 9, 2008
मराठा सेवा संघाचे अधिवेशन उत्साहात सुरु...
मराठा आरक्षणासाठी आता नियोजनबद्ध लढा - नेताजी गोरे
अमरावती, ता. ८ - अठरा वर्षांच्या कार्यकाळात मराठा सेवा संघाने वेळ, पैसा, कौशल्य व श्रमबुद्धीचा विकास साधला. या माध्यमातून समाजाची सेवा करणारी ही चळवळ आता गावागावांपर्यंत पोचली असली,तरी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी आता नियोजनबद्ध लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांनी आज (ता. आठ) येथे केले. येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात मराठा सेवा संघाच्या १३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात मराठा सेवा संघाच्या १३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. उद्घाटन राज्याच्या जलसंपदा विभागाचे सचिव व्यंकटराव गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. पंजाबराव देशमुख विचारपीठावर नंदा गायकवाड, पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जी. पी. गरड, अमरावती विभागाच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एम. व्ही. पाटील, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. अरुण शेळके, संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष अनंत चोंदे, कर्नाटक येथील राजाराम गायकवाड, उत्तर प्रदेशचे डॉ. गगवार, हरिभाऊ ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्याध्यक्षा जयश्री शेळके, डॉ. साहेब खंदारे, विजयकुमार ठुबे, देवानंद कापसे, डॉ. गणेश पाटील, राजाभाऊ तायवाडे बी. टी. देवरे आदी उपस्थित होते. सभागृहात मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार बबनराव मेटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोरे म्हणाले, संस्कृती, इतिहास, धर्मकारण, राजसत्ता अशा विविध आघाड्यांवर मराठा सेवा संघाने कार्य केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण लागू व्हावे, यासाठी प्रत्येकाने आता पुढे येण्याची आवश्यकता आहे. कुणबी व मराठ्यांना संधी दिली गेली नाही, त्यामुळेच हा समाज मागे राहिला. परंतु, "सरकार कमी तिथे आम्ही' हे आम्ही सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे सरकारने आता आमच्या समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, यासाठी गावागावांतून जनजागृती करण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करावे. गायकवाड म्हणाले, "अनेक प्रश्न सोडविताना अडचणी येत असतात; मात्र लोकसेवेत असतानाही समाजाची सेवा करणारी मंडळी या संघटनेत आहे. शेतकरी हा आपल्या समाजाचा गाभा आहे. शेतीला पाणी मिळावे व विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी शासनाने केलेले प्रयत्न अत्यंत योग्य पद्धतीने झाल्याने येत्या काही वर्षांतच विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेती व शिक्षण या दोन आघाड्यांवर आपल्याला आता लक्ष देणे आवश्यक आहे. घरातील एका व्यक्तीने शेती करावी व अन्य सदस्यांनी जमेल तो व्यवसाय अथवा नोकरी करावी. शिक्षण योग्य पद्धतीचेच घेतले जात आहे किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे. पारंपरिक विचार बाजूला सारून कुटुंबासाठी प्रत्येकाने "रोल मॉडेल' व्हावे. केवळ भाषण देऊन काम होणार नाही, त्यामुळे प्रत्येकाने "दूत' व्हावे. काळानुरूप प्रश्न पुढे येत असल्याने हे प्रश्न ओळखण्याची क्षमतादेखील विकसित करा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. विचारपीठावर उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. विविध पुस्तकांचे व स्मरणिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनासाठी विविध राज्यांतील हजारो प्रतिनिधी अमरावतीत दाखल झाल्याने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात प्रचंड गर्दी झाली होती. संचालन चंद्रशेखर कोहोळे व सीमा देशमुख यांनी तर आभार प्रा. नरेशचंद्र काठोळे यांनी मानले.
मराठ्यांचा आत्मा जागृत करणे महत्त्वाचे - ऍड. अरुण शेळके
अमरावती, ता. ८ - पूर्वीच्या काळी मराठा समाजात विचारांची क्रांती झाल्याने सत्तेचा उदय झाला. मात्र, तो झाला नसता तर इतिहास कदाचित वेगळाच राहिला असता. पण, मध्यंतरीच्या काळात समाजातील विचार संपला. त्यामुळे प्रगतीपासून वंचित राहिलेल्या तळागाळातील समाजबांधवांना समोर आणण्यासाठी मराठ्यांचा आत्मा जागृत करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी समाजात वावरताना व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल, असे मत शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. अरुण शेळके यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर सभागृहातील डॉ. पंजाबराव देशमुख विचारमंचावर आयोजित १३व्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. या प्रसंगी उद्घाटक राज्य जलसंपदा विभागाचे सचिव व्यंकटराव गायकवाड, त्यांच्या पत्नी नंदाताई गायकवाड, तर सत्राध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जी. पी. गरड, अमरावती विभागाच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एम. व्ही. पाटील, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. अरुण शेळके, संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष अनंत चोंदे, कर्नाटक येथील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राजाराम गायकवाड, उत्तर प्रदेशातून खास अधिवेशनासाठी आलेले डॉ. गगवार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव हरिभाऊ ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्याध्यक्षा जयश्री शेळके, जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे डॉ. साहेब खंदारे, मराठा सेवा संघाचे सचिव विजयकुमार ठुबे, शिवधर्म समन्वयक देवानंद कापसे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू व स्वागताध्यक्ष डॉ. गणेश पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ तायवाडे, बी. टी. देवरे होते. पूर्वी "कास्ट'मुळे शिक्षण शक्य नसताना आज "कॉस्ट'मुळे ते महाग झाले. राज्यात दोनच शिक्षणसंस्था अशा आहेत, ज्यात समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने शिक्षित व्हावे, या भावनेतून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्था, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करून, आपले सर्वस्व पणाला लावले. त्यामुळे शिक्षण हा व्यवसाय व्हायला नको, असा उद्देश सर्वांनी डोळ्यांपुढे आज ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजाच्या प्रगतीसाठी स्थापन झालेला मराठा सेवा संघ हा कोण्या जातीचा नव्हे, तर समाजाचा संघ असून, ज्यांच्या अंगात धर्म जागृत होईल, असे सेवक मराठा सेवा संघाने घडविण्याचे आवाहन ऍड. शेळके यांनी केले. "मराठा' हा दात्यांचा समाज म्हणून ओळखला जातो. त्यामुळे समाजात मागे राहिलेल्यांना पुढे आणण्यासाठी समाजाची झोळी सदैव भरलेली असणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील काही बांधव शासकीय सेवेत असताना नोकरीव्यतिरिक्त समाजाची वेगळी सेवा कशी करता येईल, याची सुरुवात झाली आहे. मराठा सेवा संघाचेही समाजाला बळकट करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असताना रस्त्यावर उतरून नारेबाजी करण्यापेक्षा प्रथम स्वतःला सक्षम करून, समाज बळकट करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भापकर यांनी केले. यावेळी कर्नाटकचे श्री. गायकवाड, डॉ. पाटील, श्री. तायवाडे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता निळकंठ बांबल यांनी, तर संचालन चंद्रशेखर कोहळे व सीमा देशमुख यांनी केले. आभार डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी मानले.
मराठमोळ्या वैभवाची झलक मराठा सेवा संघाच्या १३व्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठमोळ्या वैभवाची झलक बघायला मिळाली. फुलांच्या वर्षावात मान्यवरांचे स्वागत करणाऱ्या तरुणी, दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, जिजाऊ वंदना आणि शिवकालीन महत्त्व विशद करणारे विचारपीठ, अशी खास रचना अधिवेशनासाठी केली आहे.
आई ही व्यक्तीआधी "संस्कार केंद्र'
अमरावती, ता. ८ - भारतीय संस्कृतीत आई ही केवळ व्यक्ती नसून, ते एक संस्कार केंद्रच आहे. मराठा सेवा संघाने पूर्वीपासूनच महिलांचा पुरस्कार केला.संत- महात्म्यांनीही महिलांना आदराचे स्थान दिले. त्याचा यथोचित आदर राखत कुटुंबाच्या जडणघडणीत एक आई आपली भूमिका यशस्वीपणे वठवीत असल्याचा सूर संत श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात उमटला. मराठा सेवा संघाच्या १३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात "आई आणि कुटुंबाची जडणघडण' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात झालेला हा परिसंवाद आमदार रेखा खेडेकर यांच्या अध्यक्षतेत रंगला. जयश्री शेळके आणि डॉ. अलका लुंगे यांनी यावेळी प्रमुख वक्ता म्हणून विचार मांडले. व्यासपीठावर डॉ. शोभा गायकवाड, मयूरा देशमुख, डॉ. जयश्री नांदूरकर, वैशाली कोहळे, कल्पना बुरंगे, सुरेखा लुंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजपरिवर्तनाची पर्यायाने देशाच्या प्रगतीची भाषा करताना ही सुरुवात मानवाच्या संस्कारापासूनच होते आणि हे संस्कार मिळतात ते एका कुटुंबातून, त्यातही प्राधान्याने आईच्या संस्कारातून. मुलाच्या सुप्तगुणांना बालपणीच हेरण्याचं कसब केवळ एका मातेतच असते. त्यांच्या आंतरिक भावना जाणून त्याला खतपाणी घालण्याची जबाबदारी या आईनेच समर्थपणे पेलली असते, असे मत डॉ. अलका लुंगे यांनी यावेळी मांडले. श्रीमती शेळके यांनी भारतीयांसह पाश्चात्य लेखकांच्या आत्मचरित्रांचे संदर्भ देत त्यांच्या जडणघडणीत आईचाच वाटा मोठा असल्याचे स्पष्ट केले. परिसंवादाचा समारोप करताना रेखा खेडेकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊंसह ताराबाई शिंदे आणि शारदाबाई गोविंदराव पवार यांचाही उल्लेख आवर्जून केला.
मराठा तितुका मेळवावा...!
ता. ८ - विविध विषयांवरील विचारमंथन... अनेक राज्यांतून आलेले प्रतिनिधी... विचारांचे आदानप्रदान व आपल्या समाजाच्या उत्थानासाठी पोटतिडकीने बोलणारी मंडळी, असे वातावरण आज श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख विचारमंच परिसरात होते.मराठा सेवा संघाच्या १३ व्या अधिवेशनानिमित्त देशभरातून हजारो प्रतिनिधी सकाळपासूनच या परिसरात दाखल झाले होते. विविध स्वरूपांच्या पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लागले असल्याने नवी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्यांचे पाय आपोआपच या ग्रंथप्रदर्शनाकडे वळले. सभागृहात प्रवेश करताच मॉं जिजाऊंच्या उत्कृष्ट रांगोळीने अनेकांना मोहित केले. त्यामुळे महिलांची या रांगोळीच्या भोवती गर्दी झाली होती. सर्वत्र उत्तम व्यवस्था असल्याने अन्य राज्यांतून आलेल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रतिनिधींसोबतच डॉ. राजेंद्र कोकाटे, मयूरा देशमुख, डॉ. नरेशचंद्र काठोळे, हरिभाई लुंगे, चंद्रकांत मोहिते, मंगेश देशमुख, अशोक काळे, बाबा भाकरे, चंद्रशेखर कहाळे, कीर्तिमाला चौधरी, डॉ. अभय गावंडे, मनोहर वानखडे, अरविंद गावंडे, बाबूराव वानखडे, दिलीप पाटील, राजेंद्र अढाऊ, प्रकाश देशमुख, साहेबराव वाटाणे, भागवत झोड, रामदास पाटील, तु. ल. बारहाते, दामोदर टेकाडे, व्ही. बी. देशमुख, एस. पी. देशमुख, प्रकाश राऊत, प्रा. शांताराम चव्हाण, प्रा. जयंत इंगोले, गोविंदराव कुबडे, वा. मा. डहाणे, अशोक कोंडे, बाबासाहेब बांबल, दिगंबर वाघ, विजय लुंगे, प्रवीण मोहोड, प्रभाकर झोड, हरिदास उल्हे, रघुनाथ रोडे, मिलिंद बांबल, सतीश रोडे, इंदूताई गावंडे, अश्विनी झोड, सुनंदा खरड, शोभना देशमुख, कांचन उल्हे, पद्मा महल्ले, वैशाली कोहळे, प्रा. कविता डवरे, प्रकाश घाडगे, डॉ. संदीप कडू, अविनाश पांडे, मनीष पाटील, प्रा. चंदा वानखडे, अजित पाटील, नितीन ठाकरे यांच्यासह राजाभाऊ तायवाडे, प्राचार्य नरवडे, गोविंदराव कुबडे, पी. पी. निकास, शोभा साबळे, वैशाली कोहोळे, मोरेश्वर देशमुख, प्रदीप वानखडे, रोहिणी बळी, शीला पाटील, अरविंद गावंडे, अभय गावंडे, मैथिली पाटील, प्रदीप वानखडे, शालिनी कावरे आदी मंडळी या परिसरात होती.
तुकोबांचे शिक्षण विज्ञानवादी - शिक्षणमंत्री
अमरावती, ता. ८ - समाजातील अपप्रवृत्तींची बेडरपणे मांडणी करणारे तुकारामांचे विचार होते. चारशे वर्षांपूर्वीचा त्यांचा विवेकवाद व विज्ञानवाद, या युगात कुणीही नाकारू शकत नाही.त्यांचे शिक्षणविषयक धोरण हे आत्मविश्वास निर्माण करणारे "विज्ञानवादी' होते, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केले. मराठा सेवा संघाच्या १३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात "जगद्गुरू तुकाराम महाराजांचे शिक्षण धोरण' या विषयावर ते बोलत होते. सत्राध्यक्षा प्रा. डॉ. छाया महाले होत्या. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. निर्मला वानखडे, माजी कुलगुरू डॉ. गणेश पाटील, डॉ. राजेंद्र कोकाटे होते. भारतात सर्वाधिक अज्ञान आहे. मात्र, चारशे वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांची आत्मविश्वासू व वैज्ञानिक मांडणी आजही नित्यनूतन ठरू पाहणारी आहे. यातून त्या संताच्या बुद्धिकौशल्याची जाण होते. "निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेची फळ।।' असे त्यांच्या अभंगगाथेतील अनेक दाखले देत श्री. पुरके यांनी त्यांच्या शैक्षणिक धोरणाची सांगड घातली. त्यात त्यांनी गमतीने आजच्या शिक्षणाची भूमिकाही स्पष्ट केली. श्रीमती महाले यांनी विज्ञानवादी समाजात अंधश्रद्धा व अज्ञानावर प्रकाश टाकत अनेक दाखले दिले. आभार प्रा. प्रेमकुमार बोके यांनी मानले.
अध्यादेश काढू शाळा- महाविद्यालयांत गणपती बसवून आरती केली जाते. ही बाब विज्ञानवादी विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही. हे बंद होण्यासाठी शासनाने अध्यादेश काढला. तो अध्यादेश अद्याप खालपर्यंत पोहोचला नाही. याची जाणीव अधिवेशनाद्वारे आयोजकांनी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांना करून दिली. हे उचित नाही, असे सांगून यासाठी पुन्हा अध्यादेश काढला जाईल, असे आश्वासन श्री. पुरके यांनी यावेळी दिले.
Subscribe to:
Posts (Atom)